रविवार, २४ जून, २०१२

बुद्ध होण्याचा आवाज

इथल्या प्रत्येक रस्त्यावरून
जराजर्जर म्हातारपण काठी टेकवत
चालत जात आहे
त्याच्या काठीची ठकठक
हृदयाला जाणवते
इथल्या प्रत्येक रस्त्याच्या कडेला
महारोगी बसले आहेत
त्यांचा  कण्हत  असण्याचा आवाज
सतत ऐकू येतो  आहे
इथल्या प्रत्येक रस्त्यावरून
एक प्रेतयात्रा जाते
गेलेल्याला दिलेल्या निरोपाचे आवाज
आसमंतात भरून रहातात
या नगरात
मोठमोठे प्रासाद उभे झाले आहेत
विलासाची नवनवी दालने उघडत आहेत
या नगरात संगीत नृत्य गायन अविरत सुरु आहे
या साऱ्या आवाजांची   
दुखरी गाज  
आणि या भूमीवर
अश्वत्थ   सळसळतो आहे
पण कुठलाच माणूस
बुद्ध झाल्याचा आवाज
दूरवरूनही ऐकू येत नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा