रविवार, २४ जून, २०१२

फक्त माझ्याच नव्हे

खूप शांतता हवी
फक्त माझ्याच नव्हे तर
प्रत्येकाच्या मनात
एकांताची एकतारी
अखंड वाजत राहायला हवी
 
कुणाच मन
पिसासारखं  उडत येऊन
केसांवर टेकलं
तर कळायला हवं
 
दूरवरून एखादी लाट
उचंबळून आपल्या दिशेने येते आहे
हे दिसायला हवं 
 
गजबज लसलस शमायला हवी
न  मिळण्यातला   सन्नाटा जाऊन
मिळण्यातून आलेली निःशब्दता हवी
 
हिमालयाचा चुरा
इथल्या रस्त्यारस्त्यावर घराघरात
भिरकवायला हवा
 
कविता लिहिण्यासारखी परिस्थिती
फक्त माझ्याच अवतीभवती नव्हे तर
प्रत्येकाच्याच भोवताली हवी
 
मग कुणीही कविता लिहिली नाही
तरी चालेल

1 टिप्पणी:

  1. >>>कविता लिहिण्यासारखी परिस्थिती
    फक्त माझ्याच अवतीभवती नव्हे तर
    प्रत्येकाच्याच भोवताली हवी

    मग कुणीही कविता लिहिली नाही
    तरी चालेल.<<<<
    अप्रतिम..पण तुम्ही मात्र लिहित राहा , आहे ती परिस्थिती तरी सुसह्य होईल.

    उत्तर द्याहटवा